राजं …!!
दहादिशा शहारल्यात… आसमंत भरुन वाहतोय ! निसर्ग आपलं काम करतोय पण ; यंदा सरकारनं तुमची जयंती साजरी करायला परवानगी नाही दिली . हो राजं !! तुमच्याच स्वराज्यात तुमची जयंती साजरी करायला परवानगी लागते इथं ! आम्ही पाहतोय राजकीय पुढार्यांचे दौरे , भाषणं , वाढदिवसाच्या पार्ट्या , पाहतोत चालू असलेले डान्स बार , दारुचे दुकानं अन् ढाब्यावर रंगलेली माणसं ! ह्यापैकी कुठंच शिरत नाही कोरोना . तो शिरतो म्हणे फक्त तुमच्या जयंतीलाच ….
राजं …!!
पण ; असंही वाटतं अधेमधे की, तुमची जयंती करणं म्हणजे तरी नेमकं काय ? मी पाहतो उघड्या डोळ्यांनी मिरवणुकांच्या नावाखाली घडणारं राजकारण आणि त्यात भरडली जाणारी आपली पोरं ! ज्यांच्या पोटात संघर्षाच्या ज्वाला भडकायला हव्या तिथे दारुचे घोट पोहचलेले दिसतात मला राजं ! अशा किती म्हणून कथा सांगायच्या ? राजं तुम्ही किमान ह्या बाबतीत तरी सौभाग्यशाली आहात की , तुमचं स्टेटस टाकल्यावर कोण्या विचारवंताना , संघटनांना , पक्षांना किंवा धर्मवेड्यांना त्रास होत नाही . नाहीतर इतर सगळ्या महापुरुषांच्या वाट्याला हे दुर्दैव आलय की , त्यांच्या बद्दल काही लिहीलं बोललं तरी वाद उफाळून येतात . तुम्ही ह्या सार्या इतिहासात ब्रम्हांडातल्या सुर्यासमान आहात . पण ; तुमचं तेज इथल्या किती जणांना उमजलय हे मनातून सांगणं कठीण झालय राजं !
राजं …!!
तुम्ही माणसं जमवली ! नेतृत्व केलं अन त्यासाठी पदोपदी त्यागही केला. आज आमच्या सगळ्यांना नेतृत्व करायचय पण ; त्याग …? तो कोणालाच नाही करायचा . इतकंच नाही तर , ज्यांनी आमच्यासाठी त्याग केला त्यांचही आमच्या लेखी मूल्यच नाही ठेवलं हो आम्ही . आता आजच पाहा ना, सगळा सोशल मिडीया भरणार तुमच्या स्टेटसने. हिंदी गाणे, ते मागं BGM सगळं वाजणार पण ; त्यात कदाचितच एखाद दुसरा सापडेल महाराज तुमच्या विचारांची मशाल पेटवणारा !! तुमचे फोटो ज्यांच्या insta id ला असतात त्याच लोकांच्या प्रतिक्रिया असतात अनेक मुलींच्या पोस्टखाली नको नको त्या … ! हे असं दिसतं नजरेला तेव्हा वाटतं महाराज की , ह्यांना कितपत कळालात तुम्ही ?
राजं …!!
अशी बरीच प्रश्नं आहेत. सांगावं कोणाला ? प्रत्येक जण संकोचित झालाय कोण्यातरी पक्षाचा, संघटनेचा झेंडा हाती धरुन. म्हणून तुम्हाला सांगतो राजं ! अवघ्या जगाने आदर्श घ्यावा आणि गोडवे गावे असे सर्वोत्तम तुमचे चरित्र असतांना सुध्दा आमच्या रक्तात, हृदयात, कपड्यात, राहणीमानात, मंदिरात राजे तुम्ही आहात पण आमच्या डोक्यात तुम्ही गेले नाही याचीच खंत आहे…! अवघा महाराष्ट्र तुम्हाला मानतो, पण फार कमी आहे जो तुम्हाला जाणतो.